*तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे*
तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे… एखादी गोष्ट प्रतिकात्मकरीत्या का वापरली जाते किंवा त्याचा काय मतितार्थ आहे याच्या मुळाशी जायला कदाचित आपल्याला वेळ मिळत नसेल, परंतु तिथपर्यंत आपण पोहोचायच्या आधीच आपल्याला समाजमाध्यमांतून त्या गोष्टीची व्यंगात्मक प्रतिमा दाखवली जाते आणि आपणही कळत न कळत त्याच्या आहारी जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा "चरखा" असो किंवा "तीन माकडे", या प्रतीकात्मक संदेशांचेही नेमके तेच होत राहते. स्वातंत्र्य चळवळीत भारताच्या स्वावलंबनाचे प्रतीक मानल्या गेलेल्या, नेहरू-पटेलांपासून सुभाषबाबूंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांनी खांद्यावर मिरविलेल्या झेंड्यावर दिमाखात डौललेल्या "चरख्यावर" जेंव्हा "क्यू झूठ बोलते हो साहब…." सारखी कुत्सित शेरेबाजी होते तेंव्हा मात्र आपल्या मेंदूचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणा आणि त्यामागील योजनेचा भेसूर चेहेरा स्पष्ट होऊ लागतो ! साधारणपणे असच काही त्यांच्या तीन माकडांचंही झालंय. तुकोबांचा एक अभंग आहे, पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥ निंदेचे श्रवण नको माझे कानी ।...