*तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे*
तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे…
एखादी गोष्ट प्रतिकात्मकरीत्या का वापरली जाते किंवा त्याचा काय मतितार्थ आहे याच्या मुळाशी जायला कदाचित आपल्याला वेळ मिळत नसेल, परंतु तिथपर्यंत आपण पोहोचायच्या आधीच आपल्याला समाजमाध्यमांतून त्या गोष्टीची व्यंगात्मक प्रतिमा दाखवली जाते आणि आपणही कळत न कळत त्याच्या आहारी जातो.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा "चरखा" असो किंवा "तीन माकडे", या प्रतीकात्मक संदेशांचेही नेमके तेच होत राहते.
स्वातंत्र्य चळवळीत भारताच्या स्वावलंबनाचे प्रतीक मानल्या गेलेल्या, नेहरू-पटेलांपासून सुभाषबाबूंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांनी खांद्यावर मिरविलेल्या झेंड्यावर दिमाखात डौललेल्या "चरख्यावर" जेंव्हा "क्यू झूठ बोलते हो साहब…." सारखी कुत्सित शेरेबाजी होते तेंव्हा मात्र आपल्या मेंदूचा ताबा घेण्याचा प्रयत्न करणारी यंत्रणा आणि त्यामागील योजनेचा भेसूर चेहेरा स्पष्ट होऊ लागतो !
साधारणपणे असच काही त्यांच्या तीन माकडांचंही झालंय.
तुकोबांचा एक अभंग आहे,
पापाची वासना नको दावू डोळा । त्याहुनि अंधळा बराच मी ॥१॥
निंदेचे श्रवण नको माझे कानी । बधिर करोनि ठेवी देवा ॥२॥
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥३॥
१९३० साली येरवडा कारागृहात असताना गांधीजींनी तुकाराम महाराजांचे जे १६ अभंग इंग्रजीत अनुवादित केले त्यापैकीच हा एक. तुकोबांच्या वैश्विक तत्वज्ञान आणि चिंतनाने भारलेल्या गांधींना त्यांचे अभंग जागतिक पातळीवर पोहोचवणे गरजेचे न वाटते तरच नवल !
या अभंगाचे गांधीजींनी केलेले इंग्रजी भाषांतर असे
O God, let me not be witness to desire for sin, better make me blind; let me not hear ill of anyone, better make me deaf; let not a sinful word escape my lips, better make me dumb; let me not lust after another's wife, better that I disappear from this earth. Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal. (16-10-1930)
विद्रोही तुकोबांची ही उद्विग्न मनोवस्था गांधीजींसारख्या काळाच्याही पुढे जाणाऱ्या माहात्म्यास प्रकर्षाने जाणवणे हे जितकं सहज समजू शकणारं होतं तितकंच त्यांच्या अनेक सामाजिक संकल्पनांमध्ये पडलेलं तुकोबांच्या विचारांचं प्रतिबिंबही आश्चर्यजनकच ! गांधीजींचा "तेलीस्मान" असो किंवा त्यांची "शेवटच्या माणसाचे अश्रू" पुसण्याची संकल्पना दोन्ही तुकोबांच्या "जे का रंजले गांजले…" या अभंगांच्या अगदी जवळपास पोहोचणारेच विचार मानावे लागतील. गांधीजींनी तुकोबांचे जे १६ अभंग इंग्रजीत अनुवादित केले, हाही त्यातलाच एक !
त्यामुळे खरंतर तुकाराम महाराजांचे अभंग जगामध्ये पहिल्यांदा इंग्रजीत अनुवादित करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणूनही गांधीजींकडे पाहिलं गेलं पाहिजे !
वरील "पापाची वासना…" अभंगाचे प्रतिबिंब म्हणजेच त्या तीन माकडांच्या संकल्पनेमागचे तत्वज्ञान.
तुकोबांचे तत्वज्ञान हे वैश्विक असल्याची तीव्र जाणीव सर्वप्रथम गांधीजींनाच होणे असेही त्यांनी केलेल्या या भाषांतराकडे बघून आपण म्हणू शकतो, म्हणजेच तुकोबारायांना "जगदगुरु" का म्हणावं याची पुष्टी म्हणूनही गांधीजींच्या या कृतीकडे आपण पाहायला हरकत नाही !
"निषिदात्सु फुजी" नावाचा एक बौद्ध भिक्षु १९३१ ला भारतात आला आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण जीवन अहिंसेच्या प्रचार-प्रसारासाठी व्यतीत करण्याचे ठरवले आणि त्याचवेळी त्याने जपानहून आणलेली "चिनी मातीची" ती तीन माकडे ज्यांची नावे जपानी संस्कृतीच्या मान्यतेनुसार, वाईट न बघणारा 'मिझारू', वाईट न ऐकणारा 'किकाझारू' आणि वाईट न बोलणारा 'इवाझारू', गांधीजींना भेट म्हणून दिली. ही भेट मिळण्यापूर्वीच गांधीजी तुकोबांच्या अभंगांतून इतके प्रेरित झाले होते की अगदी त्यांच्या प्रार्थनेतही तुकोबांच्या अभंगांचा समावेश होता त्यामुळे तुकोबांच्या "त्या" अभंगांचे प्रतिबिंब त्यांना त्या तीन माकडांच्या संकल्पनेमागच्या तत्वज्ञानात दिसणे हे साहजिकच होतं.
सेवाग्राम आश्रमात भेटलेल्या, बौद्ध तत्वज्ञानावर आणि पर्यायाने गांधींच्या विचारांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या "निषिदात्सु फुजी" यांना गांधीजी प्रेमाने "फुजी गुरुजी" असंही बोलवत. या फुजी गुरुजींनी आणलेला एक जापनीज ड्रमही कधी कधी प्रार्थनेच्या वेळी गांधीजी वाजवत तसेच जापनीज बौद्ध संस्कृतीतील "नम्मयो हो रेंगे क्यो" हा मंत्रही प्रार्थनेत उच्चारला जात असे ज्याचा अर्थ भगवान गौतम बुद्धांच्या "प्रबोधन" किंवा "स्वयंप्रकाशित व्हा" या संदेशाशी मिळताजुळता आहे.
पुढे तुकोबांवरच्या 'श्रीसंत तुकारामांची राष्ट्रगाथा' या डॉ इंदुभूषण भिंगारे व कृष्णराव देशमुख यांनी १९४५ साली प्रकाशित केलेल्या ग्रंथास गांधीजींनी स्वतः प्रस्तावना लिहिली, इतकंच नव्हे तर शांतिनिकेतनमधील प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांना विनंती करून त्या ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी तुकोबांचे खास चित्र काढून घेतले !
या तत्वज्ञानाचा संक्षिप्त स्वरूपातला अर्थ 'काहीही वाईट करू नये' असाच होतो, मग ते बघणे असो, ऐकणे असो किंवा बोलणे.
जगप्रसिद्ध "तोगोशू" या जपान मधील १७ व्या शतकातील बौद्ध लेण्याच्या दारावर कोरलेल्या या तीन माकडांच्या संकल्पनेपासून तुकोबांपर्यंत सर्वच महान तत्त्ववेत्त्यांनी किंवा समाजसुधारकांनी मांडलेला हा विचार म्हणजे शुद्ध अंतःकरणाच्या मनाच्या उद्विग्न अवस्थेचा परमोच्च बिंदू होय !
स्वच्छ आणि सुंदर चारित्र्याच्या कसोटीवरचे हे तत्वज्ञान त्यामुळेच गांधीजींना आवडले असावे.
कोणतंही तत्वज्ञान, चिंतन किंवा विचार जसजसा येणाऱ्या पिढ्यांतील सच्च्या लोकांकडून आत्मसात करून अनुसरला जातो तसतसा तो अधिकाधिक समृद्ध, व्यापक आणि उत्कट होत जातो हेच गांधीजींच्या या तीन माकडांवरून स्पष्ट होते.
तुकोबांच्या आणि बौद्ध संस्कृतीतल्या या उदात्त विचाराला गांधींमुळे जगभर प्रचंड मोठे व्यासपीठ मिळाले आणि त्या सुंदर विचाराची व्याप्ती घरोघर पोचली !
जसं "चरखा" स्वावलंबनाचं प्रतीक होता तसंच "तीन माकडेही" बौद्ध संस्कृती ते तुकोबारायांच्या तत्वज्ञानाचे प्रतीकच ! परंतु अनेक दशके "कपटी आणि विषारी कुजबुज मोहिमांमधून" आपल्या मनावर मात्र या अत्यंत संवेदनशील आणि उत्कट प्रतीकांची प्रतिमा "दुबळेपणा, उपहास, आणि कुचेष्ठा" यापद्धतीनेच रंगवली गेली आणि आपणही अलगद याची शिकार होत गेलो !
त्यामुळे मित्रांनो, व्हॉट्सऍप-फेसबुक वरील कुत्सित आणि उपहासात्मक कुजबुजीला न भुलता आपण जर गांधीजींनी आत्मसात केलेल्या तुकोबांच्या या महान विचारावर "विचार" केला तर नक्कीच गांधीजींच्या विचारांच्या व्याप्तीचा आवाका समजून घ्यायला मदत होईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने आपल्या लक्षात येईल की "गांधी" या नावात अशी काय जादू होती की सर्व स्तरातील, सर्व जातीधर्मांतील कोट्यवधी निशस्त्र लोक घराबाहेर पडले आणि बंदूकधारी-सशस्त्र सैनिकांपुढे आत्मविश्वासाने, एकजुटीने, धैर्याने, निर्धाराने आणि सर्वात महत्वाचं "निर्भयपणे" उभे ठाकले !!
गांधी जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
लेखन - तेजस शेळके
Comments
Post a Comment