ओ "स्त्री" कल आना...

( शीर्षक जरी राजकुमार राव यांच्या चित्रपटाचे असले तरी स्त्रियांसाठीची परिस्थिती मात्र सारखी आहे...)

काही दिवसांपूर्वीच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रो कडून चांद्रयान-३ चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. ही बातमी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी गौरवाची बाब आहे. ही गोष्ट दर्शविते की, भारत वैज्ञानिक दृष्ट्या गरुड झेप घेत आहे. विशेषतः यात महिलांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि महिलांची एक टीम यातील महत्वाचा भाग म्हणून काम पाहत आहे. देशभरात या टीमचे खूप कौतुक झाले, कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर काहींनी व्हायरल झालेल्या फोटोचे इतकं बारकाईने निरीक्षण केलं की, त्या शास्त्रज्ञांनी काय घातलं आहे? नथ, मंगळसुत्र घातलं की नाही? केसांना गजरा लावला की नाही? आणि सगळे प्रॉडक्ट इन्स्पेक्शन केल्या नंतर ह्या स्त्रियांना "संस्कारी" असण्याच सर्टिफिकेट देण्यात आले. मला त्यांच्या पेहराव्याचा काहीही त्रास नाही आणि कुणाला तो नसावाही, जो तो त्याचा वैयक्तिक प्रश्न. 

बरं ही सर्टिफिकेट वाटणारे तीच लोकं आहेत ज्यांनी सावित्रीबाईंना दगडी मारून त्यांच्या चळवळीला विरोध केला होता, ही तीच लोकं आहेत ज्यांनी सती प्रथा पुनःस्थापित करण्यासाठी धिंगाणा घातला होता. थोडक्यात काय तर यांना स्त्रियांचं उत्थान होताना पाहवत नाही. काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे, धीरेंद्र शास्त्री(तथाकथित बागेश्वर महाराज) नामक एका व्यक्तीने तर चक्क कमेंट केली की, "स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत सिंदूर नसेल तर समजावं की हा 'प्लॉट' अजून रिकामा आहे." ...याचा अर्थ तुम्हाला कसा घ्यायचा आहे, हे मी वाचकांवर सोडतो.
मागील काही महिन्यांपासून मणिपूर पेटत आहे. तिथे दोन समुदायात वाद सुरू आहे. वाद इतक्या कळसावर येऊन पोहोचला की, दुसऱ्या जमातीतील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आली, अक्षरशः मन स्तब्ध करणारा का किळसवाणा प्रकार होता. ही बातमी कुठल्याही पुरोगामी राष्ट्रासाठी मान झुकवणारी आहे. महाभारत, श्रीकृष्ण आणि द्रौपदीचे दाखले देणाऱ्या भारतासाठी हे अशोभनीयच आहे.

महिन्यांभरापूर्वी अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची मुलाखत घेतली होती. महिला सशक्तिकरणावर त्यांना प्रश्न विचारला होता, त्यांनी त्यावर विलक्षण उत्तर दिले होते. त्यांचं म्हणणं असं होतं की, " महिलांना सशक्तिकरणाची गरज नाही, फार मागे गेला तो काळ. आता गरज आहे ती महिलांनी आक्रमकता अंगीकारण्याची." अगदी बरोबरच आहे.. खरंतर कुणाला वाटत नाही की आपली आई, ताई, पत्नी यांनी सर्वोच्च यश प्राप्त करावं, पण ते होतंय का? एखादा अपवाद सोडला तर देशाला महिला पंतप्रधानही मिळेना झालंय हेच खरं. आज जगभरात स्वतःची पाठ थोपवून घेण्यात पुढे असणारे 'महिला सुरक्षा' बद्दल बोलताना मात्र संसद असो वा रस्ता दोन्हीकडे सपशेल अपयशी ठरलेत हे ही सत्य मानावेच लागेल. या गोष्टीवर बोलण्यात मिडियालाही तितकासा रस कधी दिसून येत नाही. महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात रूढी, परंपरा, बेगडीपणाच्या नादात महिलांना खेळणं म्हणून वागवणं कधी थांबणार देवच जाणे!


- तेजस शेळके 

Comments

Popular posts from this blog

*तुकोबाराय, गांधीजी आणि तीन माकडे*

* 'Hijab' instead of 'Kitab' *

*उड़ान*